ख्राइस्टचर्च : न्यूझीलंडविरूध्द होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी सराव सत्रात सहभागी झालेला सलामीवीर पृथ्वी शाॅ याला दुखापत झाली आहे. या सामन्यासाठी तो पूर्ण तंदुरस्त ठरला नाही तर नवोदित शुभमन गिल याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सराव सत्रात पृथ्वीच्या पायाला दुखापत झाली. तसेच पायाला सूज आली असून त्याची वैदयकीय चाचणी घेण्यात येणार आहे. शनिवारपासून सुरू होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पृथ्वीची रक्त तपासणी केली जाणार असून त्यानंतरच त्याच्या दुखापतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
पृथ्वी जर या सामन्यात खेळू शकला नाही तर शुभमन गिलला संधी मिळेल. तो मयक अग्रवालसह सलामीला फलंदाजी करेल. पृथ्वीचा वैदयकीय अहवाल आल्यावर जर पृथ्वी खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले तर गिलला संधी दिली जाईल, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले आहे.