ख्राइस्टचर्च : भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जात असलेला जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीतील दशहत न्यूझीलंडमध्ये सपशेल संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुमराहच्या गोलंदाजीचे व्हिडीओ पाहून त्याचा अभ्यास करून न्यूझीलंडचे फलंदाज त्याच्यावर वर्चस्व राखताना दिसत आहेत.
अॅक्राॅस द लाईन तसेच टो ब्रेकर याॅर्कर चेंडूंचा धसका जगभरातील फलंदाजांनी घेतला होता. बुमराहच्या गोलंदाजीला काय उत्तर द्यायचे या चिंतेत सर्व फलंदाज असतात. न्यूझीलंडचे फलंदाज तर त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर हतबल झाल्याचेही पाहायला मिळाले होते. गतवर्षीपासून झालेल्या अनेक मालिकांमध्ये बुमराहने फलंदाजांवर चांगलाच अंकुश ठेवला होता, मात्र न्यूझीलंडविरूध्दच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तसेच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत बुमराह साफ अपयशी ठरला.
त्याला एक बळीदेखील मिळविता आला नाही. याचे कारण आता उघड झाले आहे. परफाॅर्मन्स अॅनालिस्ट तसेच व्हिडीओ अॅनालिस्ट यांच्या मदतीने न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बुमराहच्या गोलंदाजीचे अवलोकन केले व त्याच्यावर वर्चस्व कसे राखायचे याचा गृहपाठ केला व अविश्वसनीय यश मिळविले.
विश्वकरंडक स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त होऊन या मालिकेसाठी संघात पुनरागमन केले. अर्थात एकीकडे भारतीय संघाला त्याच्या परतण्याने समाधान वाचले होते, मात्र आता त्याचे अपयशच संघासाठी मारक ठरत आहे.