इस्तंबुल : तुर्कीमध्ये आज सकाळी 5.7 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. त्यामुळे शेजारील इराणमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. तर दोन्ही देशांमधील किमान डझनभर नागरिक जखमी झाले.
भूकंपामध्ये मरण पावलेल्या 8 जणांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे, असे तुर्कीचे गृह मंत्री सुलेमान सोयलू यांनी अनाडोलू या वृत्तसंस्थेला सांगितले. एकूण 21 लोक जखमी झाले असून त्यापैकी 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे आरोग्यमंत्री फहारेटीन कोका यांनी सांगितले.
तर इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतात किमान 40 लोक जखमी झाले असून त्यापैकी 17 जणांना रुग्णलयत दाखल करण्यात आले आहे. इराणमधील 43 गावांमध्ये नुकसान झाले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू इराणच्या सीमेजवळ आणि भूगर्भात 6 किलोमीटरवर होता. इराण सीमेवरील व्हॅन प्रांतातील बर्फाच्छादित अनेक गावात घरे कोसळली आहेत. या पडझड झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली कोणीही अडकलेला नाही, असे राज्यपाल मेहमेट एमीन बिल्मेझ यांनी सांगितले. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी आपल्या गृहमंत्र्यांशी फोनद्वारे या भागातील बचावकार्याची माहिती घेतली.