जेम्स बॉन्ड फ्रॅन्चायजीमधील 23 वा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. त्याच्या रिलीज डेटमध्ये एक बदल झाला आहे. “नो टाईम टू डाय’हा सिनेमा भारतात 3 एप्रिलला रिलीज होणार होता. तो आता एक दिवस आगोदरच म्हणजे 2 एप्रिलला रिलीज होणार आहे.
या बदलामुळे “नो टाईम टू डाय’च्या वीकएन्ड कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात हा सिनेमा इंग्रजीबरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेतही रिलीज होणार आहे. डॅनिएल क्रेगचा हा पाचवा बॉन्डपट असणार आहे. 2006 मध्ये “कसिनो रॉयल’मधून डॅनिएल क्रेगने बॉन्ड साकारायला सुरुवात केली. त्यानंतर “क्वांटम ऑफ सोलेस’, “स्कायफॉल’ आणि “स्पेक्टर’मध्ये बॉन्ड साकारला आहे.
“स्कायफॉल’ने ब्रिटनमध्ये उत्पन्नाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. नव्या “नो टाईम टू डाय’च्या एका ब्लॅक ऍन्ड व्हाईट पोस्टरमध्ये डॅनिएल क्रेग आणि अना दे अर्मस एका कारमध्ये बसलेले दिसत आहेत. कारच्या काचेवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आहेत. या बॉन्डपटामध्ये ऑस्कर विजेता रामी मलेक हा मुख्य व्हिलन असणार आहे. त्याशिवाय दाली बेनवाला आणि लैशना लिंचदेखील अन्य कलाकार असणार आहेत.