वाघोली -विश्वासघात करून साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र अपहार करणाऱ्या महिलेला लोणीकंद पोलिसांनी पकडले. यवत पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस करण्यात लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. आशा राजू लोणकर (वय 49, रा. दावडी, लोणकर वस्ती, ता. खेड), असे गंडा घालणाऱ्या महिलेचे नाव आहे.
दि 21 रोजी वाघोली गावच्या हद्दीत महाशिवरात्री असल्याने वाघेश्वर मंदिर येथे बंदोबस्त कमी हजर असताना यवत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी महिला वाघोली येथे भारत पेट्रोलपंपाजवळ असल्याबाबत फिर्यादी यांच्या नातेवाईकांकडून बातमी मिळाली. याठिकाणी हवालदार बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, आशा इटनर, प्रतीक्षा पानसरे यांनी खात्री केली. ती महिला आढळली. तिची विचारपूस केली असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली.
तिने गुन्ह्याची कबुली दिली. ती आणखी वेगवेगळ्या नावाने राहत असल्याचेही सांगितले. महिलेने फिर्यादीच्या नातेवाईकांना लग्नासाठी मुलगी दाखवते म्हणून त्यांच्याकडून साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र वापरण्यासाठी घेतले. परत देण्यास टाळाटाळ केली. 90 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्राचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. या महिलेने आणखी बऱ्याच लोकांना फसवल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे.