जामखेड – गेले दहा वर्षांत केलेले काम व विशेषतः पाच वर्षे जलसंधारणाच्या खात्यामार्फत केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने आगामी राज्यसभा अगर विधानपरिषदेसाठी संधी दिल्यास त्याचा फायदा जिल्हा व राज्यासाठी करून दिलेल्या संधीचे सोने करील, अशी भावना माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
प्रा. शिंदे तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, भाजप व मित्रपक्षांचे विधानसभा सदस्य संख्या पाहता राज्यसभेच्या तीन जागा व विधानपरिषदेच्या चार जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात. मी गेल्या दहा वर्षात केलेले काम व विशेषतः पाच वर्षे मंत्री म्हणून जलयुक्त शिवार अभियानचे चांगले काम केले. राज्यभरात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एका मोठ्या बड्डे घराण्याशी लढा देताना माझा कर्जत -जामखेड मतदारसंघात पराभव झाला.
या सगळ्या पार्श्वभूमिवर मी केलेले काम व माझ्या कामाचा अनुभव पाहता पक्षनेतृत्वाने संधी दिल्यास मी चांगल्या पद्धतीने काम करील. परंतु हा निर्णय पक्षनेतृत्वाने करायचा आहे. नव्यानेच प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली. ते व विरोधी पक्षनेते आहे, कोअर कमिटी आहे. केंद्राचे नेतृत्व आहे ते जे निर्णय घेतील. तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान्य राहील जर मला संधी मिळाली तर जिल्ह्यासाठी त्याचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील.