पिंपरी – भोसरी-इंद्रायणीनगर येथे पाण्याच्या दलदलीच्या क्षेत्रात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून उद्यान उभारण्यात आले आहे. संबंधित दलदलीच्या क्षेत्रामुळे परिसरातील नागरिकांचा त्याचा त्रास होत होता. मात्र, आता उद्यान उभारणीमुळे हेच क्षेत्र त्यांच्यासाठी सुखदायी ठरणार आहे.
इंद्रायणीनगरमधील नागरिकांना उद्यानाची सुविधा आवश्यक होती. त्यांची ही गरज लक्षात घेऊन प्राधिकरणाकडून उद्यान उभारण्यात आले आहे. सध्या उद्यान उभारण्यात आलेल्या जागेत पूर्वी दलदल साचली होती. त्यामुळे येथील नागरिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत होता. पर्यायाने, आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर उपाय म्हणून प्राधिकरणाकडून उद्यान उभारणीचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पातील भूखंडाचा उंच-सखलपणा राखुन उद्यानाचे नियोजन करण्यात आले. येथील पाण्याच्या दलदलीचा भाग हा सुशोभित तळ्यात रूपांतरित करण्यात आला आहे.
उद्यानात लॉन एरिया, मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. 8 हजार 170 चौरस मीटर जागेत संबंधित उद्यानाची उभारणी केलेली आहे. उद्यानात 300 मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आल. उद्यान उभारणीसाठी 2 कोटी 32 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या समोरच महापालिकेने स्केटींग रिंग प्रकल्प राबविलेला आहे. त्यामुळे येथे भेट देणाऱ्या नागरिकांना एकाचवेळी उद्यान व स्केटींग रिंग असा दुहेरी आनंद घेता येणार आहे. विशेषत: बालगोपाळांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. प्राधिकरणाने उभारलेले हे उद्यान पुढील देखभालीसाठी महापालिकेकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.