मुंबई : लोढा समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्थापन करण्यात आलेल्या क्रिकेटपटू संघटनेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संस्थेचे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र, त्यांना कामकाज तसेच अन्य कार्य पार पाडण्यासाठी निधीची आवश्यकता होती.
या संस्थेने 15 ते 20 कोटींचे अंदाजपत्रक आखले आहे आणि त्यासाठी त्यांनी 5 कोटी रुपयांची मागणी मंडळाकडे केली होती. पण त्यांना 2 कोटींचाच निधी देण्यात आला. ही संघटना आता मुंबईत एक कार्यालय तयार करणार आहे.
कराच्या मुद्द्यावरून 2 कोटींपेक्षा जास्त रक्कम एकाचवेळी देता येत नाही. तरीही भविष्यात त्यांना मंडळावर अवलंबून न राहता स्वतः निधी उभारावा लागेल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.