बारामती – “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात श्री दत्त महाराजांचा मळद येथून निघालेला पालखी सोहळा बारामती येथील गुजर इस्टेट येथे पहिल्या मुक्कामासाठी रविवारी (दि. 16) विसावला. सायंकाळच्या सुमारास पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण बारामती येथे पार पडले.
पालखी सोहळ्यात जवळपास 2000 पेक्षा अधिक भाविक सहभागी झाले आहेत. टाळ मृदंगाच्या जयघोषात श्रीदत्त नामाच्या गजराने बारामती शहरातील वातावरण भक्तीमय झाले होते. दरम्यान, झांजपथक व फटाक्यांच्या आतषबाजीत बारामती शहरात पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत झाले. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात
आल्या होत्या.
महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे मळद (ता बारामती) ते वलझडवाडी (ता. खंडाळा)असा श्रीदत्तपालखी रथ सोहळा आयोजित केला जातो. शहरातील गुजर इस्टेट येथील महादेवाच्या मंदिरात पालखी मुक्कामासाठी विसावली. त्यापूर्वी सोहळ्यातील पहिले अश्व रिंगण पार पडले. यावेळी टाळ-मृदंगाच्या जयघोषात भाविक देखील धावले. येथील बांधकाम व्यवसायिक मेहुल गुजर यांनी पालखी सोहळ्याच्या मुक्कामाची चोख व्यवस्था केली. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पालखी सोहळा सोमवारी (दि. 17) वलझडवाडीकडे मार्गस्थ होणार आहे. वडगाव निंबाळकर, सोमेश्वर मंदिर करंजे, नीरा, निंबुत, लोणंद, वाघोशीमार्गे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वलझडवाडी येते पालखी सोहळा पोहोचणार आहे.
दोन वर्षांपासून बारामतीत मुक्काम
मळद येथील पडळकर महाराज यांच्या मार्गदर्शनातून श्री दत्त पालखी सोहळा सुरू आहे. गेले दोन वर्षांपासून पालखी बारामती येथे मुक्कामी आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वलझडवाडी येथे भक्तिमय वातावरणात उत्सवाचे आयोजन करण्यात येते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दत्त पालखी सोहळा वलझडवाडी येथे पोहोचतो. दिवसेंदिवस पालखी सोहळ्या सोबत भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे बारामती शहरात देखील भक्तीमय वातावरणाची निर्मिती होते, अशी माहिती बांधकाम व्यवसायिक मेहुल गुजर व पराग गुजर यांनी सांगितले.