चेन्नई : सुधारीत नागरिकत्व कायद्या (का) विरोधात चेन्नईतील निदर्शकांवर केलेल्या लाठीमारामुळे अख्ख्या तामिळनाडूत निदर्शने सुरू झाली. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या निदर्शनाच्या वेळी झालेल्या झटापटीत चार पोलिस जखमी झाले. निदर्शकांनी दगडफेक केल्याने लाठीमार करावा लागला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद तामिळनाडूत किमान 12 शहरात उमटले. पोलिसांच्या अत्याचाराच्या निषेधार्थ कन्नूर मधील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पुकारला. तिरूचेंदूर येथेही जोरदार निदर्शने झाली. कुमाबाकोनाम येथे सुमारे 1000 जणांनी निदर्शने केली. मेलापालयन येथेही निदर्शनांना सुरवात झाल्याचे वृत्त आहे. चिदंबरम त्रिची महामार्ग निदर्शकांनी अनेक तास रोखून धरला. रामनाथपुरम येथे सुमारे 100 निदर्शक जमा झाले. त्यांनी पोलिसी अत्याचाराचा निषेध केला. वॉशरमानपेट येथे येथे निदर्शने झाली.
दरम्यान पोलिस आयुक्त एके विश्वनाथन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची भेट घेऊन पोलिस कारवाईची माहिती दिली. त्याच बरोबर चेन्नईत सुरू असणाऱ्या निदर्शनाची माहिती दिली.
विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. शांतपणे निदर्शने सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला, असा आरोप विरोधी पक्ष नेते एनके स्टॅलीन यांनी केला आहे. अण्णा द्रमुकला लोकशाहीची चाड राहिली नसल्याची कडवी टीका त्यांनी केली.