पत्रिकेच्या खर्चातच पुस्तकरूपी पत्रिका; जुन्नरच्या युवकाचा अभिनव उपक्रम
जुन्नर – लग्न म्हटलं की कपडे, दागिने, जेवणावळी आणि पत्रिका यावर खर्च केला जातो. जुन्नरच्या राहुल दातखिळे युवकाने पत्रिकेचा खर्च समाजप्रबोधन करणाऱ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच छापण्यासाठी करत अभिनव प्रयोग केला आहे.
जुन्नरच्या राहुल दातखिळे युवकाने लग्नासाठी महागड्या पत्रिका छापण्याऐवजी एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पत्रिका छापण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन करणाऱ्या “कळी उमलताना’ या पुस्तकाचे कव्हर असलेल्या चारही पानांवर राहुल दातखिळे या युवकाने पत्रिकेचा मजकूर छापला आहे. एका एनजीओमध्ये कार्यरत असणाऱ्या या युवकाने या पुस्तकाचीच पत्रिका केल्यामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
पत्रिकेला येणाऱ्या खर्चातच ही सत्तर पानांची ही पुस्तिका रंगीत मुखपृष्ठासह तयार झाली असून ती घरांतील महिलांसाठी उपयोगी ठरत असल्याचे या पुस्तकाचे संकलक जितेंद्र बिडवई यांनी सांगितले. पुस्तकावर पत्रिका छापण्याचा प्रयोग अनुकरणीय असून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न दातखिळे यांनी केला आहे.
जवळपास सर्वच लग्नपत्रिकांवर देव-देवतांचे फोटो असतात. अनेक दिवस “त्या’ भारीतल्या पत्रिका सांभाळून ठेवल्या जातात. नंतर काही जण वाहत्या पाण्यात सोडतात, तर काही जण रद्दीत. आजच्या पत जपण्याच्या या स्पर्धात्मक समाजात पत्रिका ही एक प्रतिष्ठेची बाब बनली आहे. याकरिता पाच रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत एका पत्रिकेवर खर्च केला जातो. जर एखाद्या प्रबोधन करणाऱ्या किंवा चांगली माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या कव्हरवर पत्रिका छापली तर निश्चितच सर्वांना फायदेशीर ठरू शकते.
– राहुल दातखिळे, अनुलोम संस्था, भागसेवक