शिस्त लावण्यासाठी शिक्षण समितीचा निर्णय
पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही शिस्त लागण्यासाठी शिक्षण समितीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका शाळेतील अनेक शिक्षक शाळेच्या वेळातही इतर कामांसाठी शाळेबाहेर फिरत असल्याचे अनेकदा आढळून येते. अशा शिक्षकांवर नियत्रंण ठेवण्यासाठी आता महापालिका शाळेतील शिक्षकांना गणवेश सक्ती करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीने आपल्या बैठकीत मान्यता दिली आहे. त्यामुळे, लवकरच महापालिका शाळेतील शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या 105 व माध्यमिक विभागाच्या 18 अशा एकूण 123 शाळा आहेत. या शाळेमध्ये 1 हजार 174 शिक्षक कार्यकरत आहेत. तर हजारो विद्यार्थी महापालिका शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. महापालिका शाळेतील कारभारात सुधारणा व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिका शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळामध्ये इतर कामासाठी शाळेच्या बाहेर जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे.
असे प्रकार रोखण्यासाठी आता खासगी शाळेप्रमाणे महापालिका शाळेतील शिक्षकांनाही गणवेश सक्ती केली जाणार आहे. शिक्षकांना गणवेश सक्ती केल्यामुळे शाळेमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण होणार आहे. याबाबतचा ठराव शिक्षण समितीने मंजूर केला असून शिक्षकांचा गणवेश कसा असावा, त्याचा रंग कसा असावा याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी जोत्सना शिंदे यांनी दिली आहे.
शाळेतील सफाई कामगारांना किमान वेतन
पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या सर्व शाळेमध्ये मानधनावर सफाई कामगार कार्यरत आहेत. या सफाई कामगारांना दोन हजार रुपये प्रतिमहा मानधन मिळत आहे. सध्याच्या काळात दोन हजार रुपयांमध्ये सफाई कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे शक्य नाही. त्यामुळे शाळेतील सफाई कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान वेतन अदा करावा याबाबतचा ठरावही शिक्षण समितीने संमत केला आहे.