पुणे – मागील एक वर्षापासून शहरात धावत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपी ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसला नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये या बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, सद्यस्थितीत भेकराईनगर डेपोत 78 बसेस दैनंदिन संचलनात आहेत. साध्या बसेस प्रमाणेच तिकीट दर आणि वातानुकूलीत प्रवास यामुळे नागरिक या बसेसना पसंती देत आहेत. यामुळे भेकराईनगर डेपोतील उत्पन्नात वाढ झाली आहे. जानेवारी 19 मध्ये या डेपोतून डिझेल, सीएनजी बसेस धावत होत्या. मात्र, आता केवळ इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येतात.
भेकराईनगर डेपोतील जानेवारी 2019 मध्ये दैनंदिन 40 हजार 291 प्रवासी संख्या आणि एकूण सरासरी उत्पन्न 5 लाख 51 हजार एवढे होते. यात डिसेंबर 19 मध्ये वाढ होऊन 55 हजार 765 प्रवासी आणि 8 लाख 56 हजार 321 रुपये एवढे उत्पन्न मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.
वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भेकराईनगर डेपोतून इलेक्ट्रिक बसेसचे योग्य नियोजन करण्यात येते. यामुळे प्रवासी संख्येत वाढ होऊन उत्पन्नात वाढ झाली आहे, पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांनी सांगितले.
पीएमपीचे आता दैनंदिन 2 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट
गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर, पीएमपीच्या सक्षमीकरणासाठी सोमवारी (दि.10) एकाच दिवशी 1700 बस मार्गावर सोडून दैनंदिन उत्पन्न 2 कोटी करण्याचे उद्दिष्ट पीएमपीने ठेवले आहे.
पीएमपीच्या दररोज 1400 ते 1500 बस संचलनात असतात. यामधील, काही जुन्या बस असल्याने पीएमपीच्या आर्थिक उत्पन्नाला फटका बसत आहे. मात्र, पीएमपीने सर्वाधिक बस संचलनात आणून उत्तन्न वाढीचा विक्रम करण्याचे ठरविले आहे. यासाठी, मध्यवर्ती कार्यालयाकडील सर्व खातेप्रमुख आणि विभागप्रमुख कर्मचाऱ्यांसह वेगवेगळ्या बस स्थानकावर हजर राहुन प्रवाशांमध्ये जनजागृती करत आहेत. याचबरोबर, शहरातील 13 डेपोमधील सर्व बसेस मार्गस्थ करण्यासाठी वर्कशॉप विभागाकडून बस देखभाल दुरुस्ती विभागातही गाड्यांची तपासणी सुरू केल्याचे, पीएमपी प्रशासनाने सांगितले आहे.