गणित प्रयोगशाळा, व्हर्च्युअल क्लासरुम, संगणकीकरणाचा समावेश
पुणे – विविध स्वयंसेवी संघटनांमार्फत चालविल्या जाणाऱ्या वसतीगृह व आश्रमशाळांमध्ये आवश्यकतेनुसार विविध सुविधा पुरविण्याची नियमावली देण्यात आली आहे. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुम, संगणकीकरण, गणित प्रयोगशाळा अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. वसतीगृहांना पुरविल्या जाणाऱ्या या सुविधांबाबत लेखापरिक्षणात आक्षेप येऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार सुविधा पुरविण्यासाठी निधी खर्च केला जाणार आहे.
राज्यात स्वयंसेवी संस्थांना अनुदान देऊन, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागस प्रवर्ग घटकातील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन अथवा ऊसतोड कामगारांसाठी निवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. आश्रमशाळांकरिता दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. मात्र, या निधीमधून या आश्रमशाळांना नेमक्या कोणत्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत, हे स्पष्ट नमूद केलेले नाही. ही बाब विभागाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे पुरविलेल्या सुविधांच्या खर्चावर लेखापरिक्षणात आक्षेप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब टाळण्याकरिता नव्याने नियमावली केलेली आहे.
नव्या सुविधांचा समावेश…
आश्रमशाळांच्या सुविधांमध्ये विज्ञान प्रयोगशाळेसाठीचे साहित्य, शैक्षणिक साहित्याअंतर्गत गणवेश, बूट, पायमोजे, हातमोजे, स्वेटर, अंतर्वस्त्रे, पेटी, स्कूलबॅग, पुस्तके, गरम पाण्यासाठी सोलर यंत्रणा, संगणक साहित्य, भाषाविषयक पूरक साहित्य, गणित प्रयोगशाळा साहित्य, ग्रंथालय, व्हर्च्युअल क्लासरुम, आश्रमशाळेचे संगणकीकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी यंत्र (वॉटर फिल्टर) , या बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या व्यतिरिक्त शैक्षणिक वर्षात आवश्यक असलेल्या अन्यस बाबींचा त्या-त्या वेळी समावेश करण्याच्या बाबीचा यात समावेश करण्यात आला आहे.