लष्करी वैद्यकीय सेवा महासंचालक लेफ्ट. जन. अनूप बॅनर्जी यांची माहिती
पुणे – “जागतिक आरोग्य समस्या बनलेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज आहे. ही लष्करी वैद्यकीय सेवेसाठी राष्ट्रीय हाक आहे. चीनच्या वुहान प्रांतातून आलेल्या नागरिकांच्या देखरेखीसाठी आम्ही विविध ठिकाणी सुविधा केंद्रे उभारली असून, त्याठिकाणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने दिलेल्या निर्देशनानुसार, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांवर देखरेख ठेवली जात आहे,’ अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अनूप बॅनर्जी यांनी दिली.
पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित वार्षिक परिषदप्रसंगी लेफ्ट. जनरल बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे (एएफएमसी) प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी व अधिष्ठाता मेजर जनरल आर. एम. गुप्ता उपस्थित होते. बॅनर्जी म्हणाले,”विषाणूसंदर्भात सर्व खबरदारी घेतली जात आहे.
चीनमधून आलेल्या नागरिकांची लष्करी वैद्यकीय सेवा केंद्रात तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या रक्ताची तपासणी केली जात आहे. यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या प्रयोगशाळांमध्ये तपासणीच्या सुविधा तयार करण्यात करण्यात येत आहे. एम्स, आसीएमआर, एनआयबीएम अशा संस्थांचीही मदत घेतली जात आहे. याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीर आणि ईशान्य सीमाभागातही चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. दिल्ली आणि मुंबई आंतरराष्ट्रट्रीय विमानतळ परिसरात सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत. परंतु गरज वाटल्यास आणि आदेश मिळाल्यावर दक्षिण भारतातही याप्रकारे सेवा केंद्र उभारणार,’ असे बॅनर्जी म्हणाले.
परिषदेत लष्करी वैद्यकीय सेवेतील विविध विषयांसदर्भातील शोधनिबंध सादर करण्यात आले आहेत. उत्कृष्ट शोधनिबंधासाठी लेफ्टनंट कर्नल संतोष करांडे यांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ, एअर कमांडर शम्कर सुब्रम्हण्यम यांना चीफ ऑफ नेव्हल स्टाफ आणि विंग कमांडर अवधेश ओली यांना चीफ ऑफ एअर स्टाफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जवानांचे डीएनए संरक्षित करण्याची योजना
“युद्ध, दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटामध्ये मृत जवानांची ओळख पटवण्यासाठी जवानांचे डीएनए संरक्षित करून ठेवण्याची योजना लष्करी वैद्यकीय सेवा विभागातर्फे राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अतिजोखमीच्या ठिकाणी तैनात असलेल्या जवानांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. पाणबुडी, लढाऊ विमान, जहाज सारख्या ठिकाणी काम करत असलेल्या जवानांचे व कलांतराने भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांतील सर्व जवानांचे डीएनएचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती लेफ्ट. जनरल बॅनर्जी यांनी दिली.