महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित
मुंबई: आज नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सिडको प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांविषयी बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीतील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. सिडकोने जमीन संपादित केल्यापासून गावठाण विस्तार वाढ झाली नसल्याने लोकसंख्येत वाढ होईल तशी गरजेपोटी गावठाण हद्दीच्या बाहेर बांधकामे झाली. ही सगळी जुनी बांधकामे वर्षानुवर्ष असून त्यांची मोजणी होऊन बांधकामे नियमित करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी प्रकल्पग्रस्तांनी केली.
शरद पवार म्हणाले, गावठाण हद्दीच्या बाहेरील बांधकामांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे व त्याबाबत आवश्यक ती योजना तयार करण्याचे ठरले. सदर स्कीम माननीय उच्च न्यायालयाच्या देखील निदर्शनास आणून बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर तोडगा काढण्याविषयक सकारात्मक चर्चा झाली.
प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना लिजवर सिडकोने ज्या जमिनी दिल्या आहेत त्या साठ वर्षांच्या ऐवजी ९९ वर्षांच्या करण्याबाबत देखील शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे. एकंदरीत कित्येक दशकं प्रलंबित असलेले ठाणे-नवी मुंबई परिसरातील प्रकल्पबाधितांचे प्रश्न महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार मार्गी लावेल अशी खात्री असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.