मोबाईल चोरणारे 40 आरोपी जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून चार मोबाईल लांबविणाऱ्याला चार महिने तुरूंगवासाची शिक्षा रेल्वे न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी सुनावली. याबरोबरच त्याला दोन हजार रुपये दंडही सुनावण्यात आला आहे.

शाहरूख रशिद खरादी (वय 24, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पुणे रेल्वे स्टेशन हद्दीत प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने लोहमार्ग पोलीस अधीक्षक दीपक साकोरे यांनी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग गुन्हे शाखेने सापळा रचून शाहरूख याला अटक केली. त्याने शिवाजीनगर येथे असे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्याच्याकडून रेल्वे पोलिसांनी चार घटनांमधील 39 हजार 599 रुपयांचे चार मोबाईल जप्त केले आहेत.

पोलीस नाईक साळुंके यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सहायक पोलीस फौजदार सुनील बांडे आणि पोलीस हवालदार भिमाशंकर बमनाळीकर यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान या मोहिमेतंर्गत लोणावळा ते पुणे प्रवासात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या 40 जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून 7 लाख 76 हजार 318 रुपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रेल्वेत प्रवास करताना दरवाज्यात राहुन मोबाईलवर बोलताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.