नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देशसेवेसाठी तरुण सैनिक तयार करणार आहे. आरएसएस स्वतःची पहिली सैनिक शाळा उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये उघडणार आहे. यावर्षी एप्रिलपासून या शाळेचे सुरवात करण्यात येईल. रज्जू भैय्या सैनिक विद्या मंदिर (आरबीएसव्हीएम) असे या शाळेचे नाव असेल.
आरएसएसमार्फत चालवली जाणारी अशा प्रकारची पहिलीच सैनिक शाळा आहे. या शाळेचे नाव आरएसएसचे माजी सरसंघचालक रज्जू भैय्या यांच्या नावावर आहे. आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार शाळेची इमारत जवळजवळ तयार झाली आहे. 160 मुलांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रवेश अर्ज सैनिक शाळेत सुरू झाले आहेत.
शाळेचे संचालक कर्नल शिव प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “एनडीए, नेव्हल कॅडमी, लष्कराच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाईल. शाळेत प्रवेशासाठी 23 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरू राहील. प्रवेशासाठी चाचणी परीक्षा 1 मार्चला होणार आहे. हि प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी वर आधारित असेल. ”
लेखी परीक्षेनंतर विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात येईल, यानंतर वैद्यकीय तपासणी होणार असून प्रवेशानंतर 6 एप्रिलपासून सुरवात होईल. विशेष बाब म्हणजे युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या मुलांसाठी शाळेत आठ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
ते पुढे म्हणाले की. शाळेत सीबीएसई अभ्यासक्रम असेल. शिक्षक आणि प्रशासकीय कर्मचार्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, भरती प्रक्रिया फेब्रुवारी अखेर संपेल. विद्यार्थ्यांसाठी फिकट निळा शर्ट, गडद निळा पँट असा गणवेश असणार आहे. तर शिक्षकांना पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि खाकी रंगाची पॅन्ट ड्रेस गणवेश असेल. ही पूर्णपणे निवासी शाळा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबरोबरच नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शन देणे करणे हा या शाळेचा हेतू असल्याचे कर्नल शिव प्रताप सिंह म्हणाले.