नवी दिल्ली : 71 व्या प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा दिल्लीतल्या राजपथावर पार पडला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या खास सोहळ्याला ब्राझीलचे राष्ट्रपती जायर मेसियास बोल्सिनारो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पथसंचलनातून लष्करी सामर्थ्याचे जगाला दर्शन घडवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तर मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवाजी पार्कमध्ये शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी एनसीसी आणि एमसीसीच्या विद्यार्थ्यांसह पोलिस खात्याकडूनही पथसंचलन करण्यात आले.
यावेळी कान्होजी आंग्रेंची शौर्यगाथा सांगणारा चित्ररथ मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी झाला. महाराष्ट्राचा “कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल” या विषयावरील चित्ररथ राजपथाच्या संचलनात सहभागी झालेला नाही. त्यामुळे या चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची शोभा वाढवली.