आपल्या एखाद्या भूमिकेसाठी काही तरी हटके करण्याच्या प्रयत्नांची चर्चा होते तेव्हा नव्या नायिकांपैकी कृती सेननचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. 2019 हे वर्ष कृतीसाठी शानदार राहिले. आशुतोष गोवारीकरच्या “पानिपत’ या चित्रपटात कृतीने साकारलेल्या पार्वतीच्या व्यक्तिरेखेबद्दल तिची सर्वत्र प्रशंसा झाली.
त्याचबरोबर “लुका-छुपी’ या चित्रपटात एका छोट्या शहरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या रश्मी नामक तरुणीची बोल्ड धाटणीची व्यक्तिरेखा कृतीने साकारली. अर्जुन पटियाला या चित्रपटात कृतीने पत्रकाराची भूमिका केली. 2019 मध्ये कृतीचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला तो “हाऊसफुल 4′. या चित्रपटात कृती अक्षयकुमारसोबत झळकली होती.
आता अक्षयकुमारसोबत कृती आगामी “बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. पार्वतीच्या व्यक्तिरेखेसाठी कृतीने चांगलीच मेहनत घेतली होती. तलवार चालवायला शिकण्यापासून ते मराठी उच्चार शिकण्यापर्यंत अनेक गोष्टी तिने आत्मसात केल्या. आता आगामी “मिमी’ या चित्रपटासाठीही ती चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे.
यासाठी तिने 15 किलो वजन वाढवले आहे. यासाठी कृतीने आपल्या आहारात कार्बोहायड्रेटस् आणि फॅटयुक्त पदार्थांचा समावेश वाढवला आहे. संतुलित शरीरयष्टीसाठी ओळखली जाणारी कृती याकाळात भूक नसतानाही खायची!