श्वेता सिंघल यांची पुण्याला बदली
सातारा – साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची पुणे येथे पदोन्नतीवर अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीवरून शेखर सिंग यांची साताऱ्याचे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
मंत्रालयातून सामान्य प्रशासनाच्या वतीने भारतीय प्रशासन सेवेतील 19 पैकी काही वरिष्ठ श्रेणीच्या बदल्या गुरूवारी दुपारी जाहीर करण्यात आल्या.
साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी शेखर सिंग 2016 च्या बॅचचे अधिकारी असून देश पातळीवर त्यांनी 306 वा क्रमांक पटकावला होता. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सिंग यांची 2018 मध्ये गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली होती. तेथील प्रशासकीय कार्यकाल पूर्ण झाल्यावर शेखर सिंग यांच्याकडे सातारा जिल्हयाची जिल्हाधिकारी या नात्याने जवाबदारी आली आहे. येत्या काही दिवसांत नवे जिल्हाधिकारी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून श्वेता सिंघल यांची पदोन्नतीने बदली झाली असून त्यांना तत्काळ पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल 2017 मध्ये सिंघल यांनी जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार सांभाळला होता.21 महिन्यांच्या कारकिर्दीत श्वेता सिंघल यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्यकाळात विधानसभा, लोकसभा तसेच पोटनिवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्या.