पिंपरी – युती करण्याबाबत मनसेकडून अजून प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील त्याबाबत विचार केलेला नाही. मनसेशी युती करायची झाल्यास त्यांची अमराठी भाषिकांबाबतची भूमिका आहे ती त्यांना बदलावी लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
आकुर्डी येथे भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्षाची निवड करण्यात आली. त्यावेळी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, 80 टक्के स्थानिकांना नोकऱ्या दिल्यास 20 टक्के तरी अमराठी व्यक्ती येणार की नाही येणार. अमराठी व्यक्ती कुठला पाकिस्तान आणि बांगलादेश मधला आहे काय? ही भूमिका जर मनसेने बदलली तर आमचे नेतृत्व बसून निर्णय घेईल. मात्र मुळात राज ठाकरेंकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही, असेही ते म्हणाले.