श्वेता सिंघल अतिरिक्त विभागीय आयुक्त : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक प्रमाणात बदल्या करताना प्रशासनात मोठे फेरबदल घडवून आणले. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल समजले जाणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांना पुणे येथे समाज कल्याण आयुक्त म्हणून पाठवले आहे.
फेरबदलात साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी, तर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांची नियुक्ती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक व पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डी. डी. पांढरपट्टे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुुंबईतील महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे. मुखर्जी यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी बदली केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारच्या काळात अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाचे प्रधान सचिव एस. ए. तागडे यांची वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी, तर वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज यांची बदली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्तपदी बदली केली आहे. तसेच विक्रीकर आयुक्त राजीव जलोटा यांना ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.
पुढील प्रमाणे बदल्या…
बी. वेणुगोपाल रेड्डी (वने, प्रधान सचिव), संजीव कुमार, (आयुक्त, विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई), पी. वेलरासू, (अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका), असीम कुमार गुप्ता प्रधान (प्रधान सचिव, ऊर्जा), शैला ए. (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई), श्वेता सिंघल (अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे), दीपक सिंगला (जिल्हाधिकारी, गडचिरोली), शेखर सिंग (जिल्हाधिकारी, सातारा), मंजू लक्ष्मी (जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग), मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी, सोलापूर), आर. बी. भोसले (सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण), नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे), डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ), आर. एस. जगताप (अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर), भुवनेश्वरी (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा), मदन नागरगोजे (संचालक, माहिती व तंत्रज्ञान मुंबई).