पहिली ते चौथीसाठी 189 विद्यार्थी ः शिक्षणाबरोबरच सामाजिक-व्यावहारिक धडे
बेल्हे – बदलत्या काळानुसार ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे “फॅड’ चालू असताना पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षाही अधिक सुविधा देऊन आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये शाळेतील शिक्षकांना गावातील ग्रामस्थांची साथ मिळाली आहे. पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे असणाऱ्या जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थांना शिक्षणाबरोबर सामाजिक व व्यावहारिक ज्ञानाचे धडे दिले जातात.
शाळेत विजेच्या बचतीसाठी सौर युनिट, डिजिटल बोर्ड, संगणक कक्ष, फिल्टर पाणी, खेळाचे साहित्य, प्रशस्त क्रीडांगण अशा अनेक सुविधा आहेत. येथील शिक्षक शाळेत हस्ताक्षर स्पर्धा, भाषण स्पर्धा, पाढे पाठांतर, खेळातून शिक्षण, बाल आनंद मेळावा, विद्यार्थ्यांना व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून बाजार भरवणे, असे विविध उपक्रम राबवत आहेत. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंतची असून 189 विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत.
या शाळेचे मुख्याध्यापक अनिल फापाळे हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, याकडे लक्ष देतात. विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किसन डुकरे, माजी सरपंच देवरामशेठ तट्टू, पांडुरंग कृपा पतसंस्थेचे चेअरमन शिवाजी डुकरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन बाळकृष्ण डुकरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे, उद्योजक संभाजी चव्हाण, ग्रामस्थ शांताराम डुकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संतोष डुकरे यांचे सहकार्य शाळेला लाभले.
या जिल्हा परिषदेच्या शाळेने डिजिटल स्वरूप प्राप्त केल्याने शाळेत इंग्रजी माध्यमाची मुलेही प्रवेश घेत आहेत. शाळेची मोडकळीस आलेली इमारत इम्फथी फाउंडेशनने बांधून देतो, म्हटल्यावर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन बैठक घेऊन शाळेच्या कामाला मदत करायची असा निर्णय घेतला आणि हनुमान मंदिराचे काम मागे ठेवून दहा टक्के लोकवर्गणी गोळा केली आणि सुमारे 1 कोटी खर्च करून शाळेची इमारत बांधून घेतली.
शाळेच्या आवारात परसबाग
शाळेच्या आवारात विद्यार्थांनी परसबाग बनवली आहे. यात कोबी, टोमॅटो, वांगी, मिरची अशा विविध भाज्यांची लागवड केली असून, विविध प्रकारच्या फुलेही आहेत. फ