प्राचीन काळातील गड ,किल्ले पाहिल्यावर तत्कालीन महापुरुषांच्या शारीरीक क्षमतेची प्रचीती होते व नकळत मन त्यांच्या शौर्यापुढे नथमस्तक होते. आम्ही आत्तापर्यंत जेजुरीच्या कडेपठारची अडीच वर्ष केलेली दर शनिवारची वारी त्यानंतर हरिश्चंद्र गड, तोरणा गड, राजगड, व्याघ्रगड ट्रेकींगचा अनुभव गाठीशी घेवुन नुकताच “राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा” चा ट्रेक पुर्ण केला.
अतिशय साहसी व रोमांचकारी असलेला “राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणा” हा ट्रेक “युथ क्लब महाड “यानी आयोजित केला होता. या ट्रेक साठी राज्याच्या विविध भागातुन ट्रेकर्स आले होते. आदल्या दिवशी आम्ही महाड चे ऐतिहासिक ” चवदार तळे ” ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक पाहुन येथील विशेष कोकणी जेवणाचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता निघुन पाच वाजता सकाळी पाचाड येथे पोहोचलो. रायगडाच्या पायथ्यापासून काही अंतरावर पोहोचुन नोंदणी चे सोपस्कार पार पाडले. या ट्रेक दरम्यान पुर्वी काही दुर्घटना झालेला इतिहास असल्याने युथ क्लब महाड द्वारे प्रत्येक समुहाबरोबर एक मार्गदर्शक दिला होता. सकाळी सातपासुन एक एक समुह सोडण्यात आला. सुमारे किलोमिटर चा ट्रेक पुर्ण करण्यासाठी आमचा समुह सकाळी साडेआठ वाजता सोडण्यात आला.
आम्ही सर्व ट्रेकर्स “रायगड प्रदक्षिणा”साठी नोंदणी कक्षापासुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो. कर्तुत्व व शुरतेचे आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या ऋणाची कृतज्ञता म्हणून आम्ही या गड किल्ल्यावर कोठेही कचरा, बिस्कीट च्या पूड्याची कागदे ,पाण्याच्या बाटल्या न फेकण्याची प्रतिज्ञा करुन सर्व कचरा आमच्या पिशव्यातुन घेण्याची व प्रत्येकाला तसे करण्याची विनंती करीत ट्रेक सुरु केला. रस्त्यात अनेक ठिकाणी दगडावरील पिवळे पट्टे ट्रेक ची दिशा दाखवत होते .सुरुवातीला अतिशय उंच वाटणारा टकमक कडा पाहीला. सपाटीपासून अतिशय उंच असा भव्य कडा पाहीला नि इतिहासात वाचलेल्या कडेलोट’चा अंदाज आला. त्याच्या टकमक कड्याच्या जवळपास पोहोचण्यासाठी आम्हाला किमान दोन तास लागले. अतिशय घनदाट जंगलात वाट काढताना काटेरी झुडुपे चुकवताना खाली वाकण्याशिवाय पर्याय नव्हताच. दोन सव्वा दोन तासाच्या अंतरावर अंदाजे सात आठ किलोमीटर अंतर आम्ही पुर्ण केले होते.
दोन-सव्वादोन तास चढ ,उतार ,जंगल ,घसरडे रस्ते चालल्यावर भवानीटोका जवळुन जात एका अवघड टप्प्यावर पोहोचलो. एका उंच चढावर बाजुनी संपूर्ण दरी असलेल्या घसरड्या मार्गाजवळ आम्ही पोहोचलो व एकदम ट्राफीक जाम झाल्यासारखे झाले. सर्वजण हळु हळू चालत होते, पाठीमागुन चला लवकर आवाज येत होता मात्र वरती अतिशय घसरडा निमुळता रस्ता होता . जवळपास निम्मा ट्रेक झाला असे सांगण्यात आले. आणी मग आली ती वाघोली खिंड.. सरळ उतार .. संपूर्ण घसरडा रस्ता… दगड गोटे व काटेरी झुडुपे एका बाजुला मोठी दरी …येथे काही स्वयंसेवक व युथ क्लब च्या सदस्यानी दोरखंड बांधला होता. त्या दोरखंडाचा आधार घेत घसरड्या वाटेवरुन आम्ही उतरू लागलो. अर्धा ट्रेक संपला होता. त्यानंतर आम्ही हिरकणी बुरुजाच्या बरोबर खालच्या बाजुने पुन्हा पायवाट सुरु केली. काटेरी झुडुपे पार करीत आम्ही रायगड प्रदक्षिणा पुर्ण केली. आमच्या शारीरिक क्षमतेची कसोटी तपासणारा रायगड चा ट्रेक अविस्मरणीय ठरला.
– ऍड. गणेश आळंदीकर