संक्रांतीपूर्वीच पक्ष्यांवर “संक्रांत” : चायनीज मांजा ठरतोय काळ
– अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – निसर्गाचा अस्सल दागिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांवर मागील काही वर्षांपासून मोठी संक्रांत ओढावली आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यापासून संकटात सापडणारे पक्षी आता कायमच चायनीज मांजाचे बळी ठरु लागले आहेत. संक्रांतीपूर्वीच गेल्या एक महिन्याच्या काळात मांजामध्ये अडकल्याने अनेक पक्षी जखमी अवस्थेत सापडले. शहरातील एक सामाजिक संस्थेकडून पशू-पक्ष्यांना वाचविण्याचे कार्य केले जाते. या एकट्या संस्थेने गेल्या एका महिन्यात सुमारे 40 हून अधिक पक्ष्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर गेल्या एका वर्षांमध्ये या संस्थेला मांजामुळे जखमी झालेले सुमारे 400 हून अधिक पक्षी आढळून आले.
विविध भागातील वृक्षांवर तुटून पडलेल्या नायलॉन मांजामध्ये अडकून जायबंदी होण्याच्या घटना घडतात. 2019 साली संपूर्ण वर्षभरात 400 जायबंदी पक्ष्यांना वाचवण्यात वन्यजीव सुरक्षा संस्था आणि अग्निशामक दलांच्या जवांनाना यश आले, तर 150 पेक्षा अधिक पक्ष्यांचा जखमी होऊन मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यापासून आत्तापर्यंत 40 पक्षी जायंबदी झाले आहेत. हा आकडा केवळ एका सामाजिक संघटनेकडील आहे. त्यामुळे, संपूर्ण शहरात दरवर्षी नायलॉन मांजामुळे किती पक्ष्यांचा बळी जात असेल, याची कल्पना देखील चिंताजनक आहे.
आनंद ठरतोय उन्माद
संक्रातीला पतंग उडविण्याचे लोण गुजरातहून हळू-हळू महाराष्ट्रभर पसरले आहे. परंतु शहरातील उत्साही संक्रातीच्या दोन-तीन महिने आधीपासूनच पतंग उडविण्यास सुरुवात करतात. बंदी असलेला चायनीज मांजा सर्रासपणे विकला जातो आणि तो वापरुन पतंग उडविण्याचा आनंद घेत मुले आणि तरुण नकळतपणे पक्ष्यांचा जीव घेतात. पतंगबाजीचा हा आनंद कसा जीवघेणा उन्माद बनतो, याची कल्पना देखील पतंगबाजांना नसावी. पतंगबाजीचा आंनद लुटताना नायलॉन मांजाचा वापर टाळला तर दुर्घटनादेखील कमी होण्यास मदत होईल, असे पर्यावरणप्रेमीचे मत आहे.
मांजात अडकून होतात जखमी
सध्या मकरसंक्राती सण असल्यामुळे मागील महिन्यापासून पुन्हा नायलॉन मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्षांची संख्या वाढत चालली आहे. दरवर्षी मकरसंक्राती सणाच्या वेळी पक्षीप्रेमींना पक्षी जायबंदी झालेल्या कॉलची संख्या वाढत असते. याही वर्षी डिसेंबर महिन्यातच असे रेस्क्यू कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या एका महिन्यात 40 पशुपक्षी जायंबदी झाले असल्याची नोंद वन्य पशू संरक्षण सामाजिक संघटनेकडे झाली आहे. शहरातील विविध भागामध्ये नायलॉन मांजामुळे 10 घारी, 8 घुबड, 15 कावळे, 4 कोकिळा, या व्यतिरिक्त भारद्वाज, नदी किनारी असणारे बगळे तसेच पानकोंबड्या देखील जखमी झाल्या आहेत. सांगवी जवळील सीएमई परिसरात एका मोरालाही चायनीज मांजाने आपले शिकार बनविले होते.
राष्ट्रीय पक्षी देखील या पतंगबाजीच्या खेळाने जखमी होत आहे. साजाजिक संघटनेव्यतिरिक्त अग्निशामक दलाकडेही मोठ्या प्रमाणात पक्षी जायबंदी झालेल्या घटनांचे कॉल येत असतात. त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवांनाकडून तात्काळ संबधित ठिकाणी जाऊन पक्षांना जीवनदान देण्याचे प्रयत्न होत असतात. त्यामुळे, पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
मकरसंक्रांत सणाच्या आगोदर आणि नंतर नायलॉन मांजामध्ये पक्षी अडकल्याचे खूप कॉल येतात. काही पक्षी किरकोळ जखमी असल्यास उडून जातात. तर गंभीर जखमी पक्षांना उपचारासाठी पशुप्रेमी तसेच डॉक्टरांकडे सोपवतो. मांजामध्ये अडकल्यामुळे पक्षांची अवस्था खूपच विदारक झालेली असते. त्यामुळे, नागरिकांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करणे टाळा. तसेच शहरात कुठेही जखमी पक्षी आढळल्यास अग्निशामक विभागाकडे संपर्क साधावा.
– अशोक कानडे उपअग्निशामक अधिकारी, पिंपरी-चिंचवड
प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रीला बंदी घातल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरात सर्रास मांजाची विक्री होत आहे. त्यामुळे, जोपर्यंत मांजाचा वापर बंद होणार नाही तो पर्यंत मांजामध्ये अडकुन पक्षी जखमी व मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण कमी होणार नाही. नायलॉन मांजा हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे हा मांजा बनवल्यानंतर तो निसर्गामध्ये विलीन होण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी लागतो. त्यामुळे, अशा मांजाची विक्री करणाऱ्यावर व वापरणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
– विनायक बडदे, सचिव, वन्य पशू संरक्षण सामाजिक संघटना