आंबिल ओढा अतिक्रमणे कारवाईचा वाद वाढणार
पुणे – मागील वर्षी 25 सप्टेंबर 2019 ला दक्षिण पुण्यात झालेल्या अतिवृष्टीने आंबिल ओढ्याला महापूर आला होता. या पूरानंतर आंबिल ओढ्यातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर पालिकेने तातडीने या नाल्याचे सर्वेक्षण केल्यानंतर 77 अतिक्रमणांना नोटीस बजाविली. मात्र, त्यातील बहुतांश बांधकामांना महापालिकेनेच 1987 च्या विकास आराखड्यातील पूर रेषेच्या आधारे बांधकामांना परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक इमारतींचे साईड आणि फ्रंट मार्जिंन नव्या सर्वेक्षणात आले आहे. त्यामुळे ही बांधकामे अधिकृत ठरवायची की अनधिकृत यावरून नवा वाद सुरू झाला आहे.
1987 च्या आराखड्यानुसार, आंबिल ओढ्याची रूंदी 18 मीटर दर्शविली आहे. त्यानुसार, पालिकेने अनेक बांधकामांना धनकवडी, कात्रज परिसरात परवानगी दिली आहे. मात्र, त्यानंतर आता पूर आल्यावर पालिकेने प्रायमुव्ह या संस्थेकडून आंबिल ओढ्याचे तातडीने फेर सर्वेक्षण केले. त्यानुसार, प्रायमुव्हने हाय फ्लड लाईनचे सर्वेक्षण करत नाल्याची रूंदी 20 मीटर धरली आहे. त्यामुळे पालिकेने मान्यता दिलेल्या अनेक इमारतींनाही अतिक्रमणांची नोटीस गेली आहे. तर प्रायमुव्हच्या अहवालानुसार, नाल्याची रूंदी 20 मीटर करायची असल्याने अनेक इमारतींचे साईड आणि फ्रंट मार्जिन काढावे लागणार आहे.