आंध्रप्रदेश सरकारची “अम्मा वोडी” योजना जाहीर
नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सत्तेवर आल्यानंतर जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या आहेत. त्यांच्या या नवीन योजनांचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यांच्या या योजनांमध्ये आता आणखी एक भर पडली आहे. त्यांनी दारिद्रय रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी अम्मा वोडी योजना जाहीर केली आहे.
राज्य सरकारच्या या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत ज्यांची मुले शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. जोपर्यंत मुलांचे शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.
राज्य सरकारने गेल्याच आठवड्यात यासंबंधी आदेश जारी करत 43 लाख मातांसाठी आर्थिक मदत मंजूर करण्याचा आदेश दिला. या योजनेअंतर्गत महिला ज्यांचे मुल सध्या शाळेत (पहिली ते बारावी) शिकत आहेत, मग ती खासगी शाळा असो किंवा सरकारी, अनुदानित असो किंवा विनाअनुदानित ते या योजनेसाठी पात्र आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या वाढावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तसेच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावा यासाठीही प्रयत्न आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अनाथ तसेच रस्त्यावर निवारा घेणारी मुलक जे स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. या संस्थांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. योजनेसाठी राज्य सरकारला 2019-2020 आर्थिक वर्षात 6455 कोटींचा खर्च येत असून त्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. लाभार्थी नेमके कोण आहेत याबाबत पारदर्शकता राहावी यासाठी ग्राम सचिवालयात यादी लावण्यात येणार आहे.