जिल्हा नियोजन समितीची 21 रोजी बैठक
सातारा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची सातारा जिल्हयात नवी इनिंग सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या 21 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता समितीची पहिली बैठक होत आहे.
जिल्हयाचे पालकत्व यापूर्वी अभयसिंहराजे भोसले, विलासराव पाटील उंडाळकर, हर्षवर्धन पाटील, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे यांनी भूषवत त्यांच्या कामाचा निश्चित ठसा उमटवला आहे. यापूर्वीचे माजी पालकमंत्री विजय शिवतारे व सातारा जिल्हयाचा संबंध डीपीसी बैठकांपुरताच होता.
जिल्हयाचे भूमीपुत्र व राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आल्याने स्थानिक प्रश्नांना न्याय मिळणार आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न, रखडलेले सिंचन प्रकल्प, कोलमडलेली आरोग्य सेवा, साताऱ्याचे प्रलंबित मेडिकल कॉलेज,वूमन्स हॉस्पिटलचा रखडलेला प्रस्ताव यासारख्या अनेक प्रश्नांचे आव्हान पालकमंत्र्यांपुढे आहे. येत्या डीपीसीच्या बैठकीत 2020- 21 च्या नियोजन समितीच्या आराखड्यातील अखर्चित निधीचा आढावा व प्रलंबित कामाचा आढावा यावेळी घातला जाणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काल संध्याकाळी घोषणा झाल्यानंतर आज येथील शासकीय विश्रामगृहात श्री. पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी स्वागत केले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सहायक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनीही पालकमंत्र्यांचे स्वागत केले. त्यांनी यावेळी माहिती कार्यालयाच्या कामकाजाची माहिती त्यांना दिली.