सातारा – येथील एका शाळेच्या परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून निघालेल्या संशयितांच्या मुसक्या पोलिसांनी वेळीच आवळल्याने अपहरणाचा डाव फसला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी ज्ञानेश्वर चव्हाण, अमित कुलकर्णी, अभिजीत शिंदे (सर्व रा. उस्मानाबाद) यांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाचा फोन खणाणला आणि साताऱ्यातील एका शाळेच्या परिसरातून पांढऱ्या रंगाच्या कारमधून एका मुलीचे अपहरण केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी प्रचंड वेगाने हालचाली गतिमान करून शहरात नाकाबंदी केली. शहरातील विविध भागांतून पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत फिरू लागल्याने नक्की काय झाले, याची माहिती घेण्यासाठी लोकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली.
यावेळी शहर वाहतूकच्या एका कर्मचाऱ्याने मोती चौकात अपहरण करणाऱ्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांच्या गाड्या गजबजलेल्या मोती चौकात धडकल्या. एका कारमधून अपहरण करून जाणाऱ्या संशयितांना अपहरण झालेल्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर संशयितांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेत त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मोती चौकात शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ताब्यातील सर्व संशयितांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.