तेलाच्या डब्यांमुळे आग भडकली; पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण
सातारा – येथील जुन्या औद्योगिक वसाहतीतील एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन अँड सर्व्हिसेस या खासगी कंपनीत मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत लागल्याने तब्बल एक कोटी रुपयांची मालमत्ता भस्मसात झाली. शेजारी असलेल्या दोन कंपन्यांनाही या आगीची झळ बसली. अग्निशमन यंत्रणांनी तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. कंपनीत असलेल्या खाद्यतेलाच्या डब्यांमुळे आगीने लगेचच रौद्ररूप धारण केल्याचे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सातारा-रहिमतपूर रस्त्यावर जुन्या एमआयडीसीत एनटेक्स ट्रान्सपोर्ट व सव्हिसेस या कंपनीचे मोठे गोडाऊन व कार्यालय आहे. या कंपनीलगत पत्रावळ्या बनवणाऱ्या कंपनीचे छोटे युनिट आहे. एनटेक्स कंपनीच्या गोडाऊनला मंगळवारी पहाटे तीन वाजता अचानक आग लागली. एका बाजूला पत्रा आणि आतमध्ये जेमिनी या खाद्यतेलाचे डबे व इतर किराणा माल होता.
त्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरून मोठे लोळ उठण्यास सुरुवात झाली. लगतच्या दोन कंपन्यांनाही या आगीची झळ बसून तेथील काही यंत्रे व पत्रावळी बनवण्याचे साहित्य जळून खाक झाले. एनटेक्स कंपनीच्या कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतके कामगार होते. आग भडकताच त्यांनी बाहेर धाव घेतली. या आगीची माहिती मिळाल्यावर सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब व कूपर कारखान्याच्या अग्निशमन दलाचा बंब पहाटे साडेतीन वाजता घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलातील दहा जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा अथक प्रयत्न केला.
आगीची धग प्रचंड असल्याने अडथळे येत होते. आगीच्या ज्वाळा गोडाऊनपासून कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत उठत होत्या. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांची शर्थीचे प्रयत्न करून सकाळी सव्वाआठपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. अमित पेपर कंपनीचे कर्मचारी अमित रघुनाथ सूर्यवंशी यांनी मंगळवारी दुपारी सातारा एमआयडीसी पोलीस चौकीत या घटनेची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या दुर्घटनेत तीन कंपन्यांचे मिळून 99 लाख 12 हजार 420 रुपयांचे नुकसान झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.