मंचर – नगरभूमापन कार्यालय नेहमीच बंद असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी कार्यालयाच्या बंद दरवाजाला पुष्पहार घालून मंगळवार (दि. 7) गांधीगिरी करीत संताप व्यक्त केला. मंचर शहरातील संभाजी चौक येथे नगरभूमापन कार्यालय आहे. हे कार्यालय सोमवार ते बुधवार उघडे राहील आणि इतर दिवशी फिरतीची कामे असल्यास बंद राहील, असा लेखी फलक दरवाजालगत लावलेला आहे; परंतु, हे कार्यालय सोमवार, मंगळवार, बुधवारीही बंद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कार्यालयाच्या पायऱ्यांची दुरवस्था झाली असून येथे प्रचंड अंधार असतो. त्यामुळे कार्यालयाला कोंडवाड्याचे स्वरुप आल्याचा आरोप अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी केला आहे. कार्यालय नेहमीच बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. प्रशासनाला जाग येण्यासाठी या कार्यालयाच्या दरवाजावर लावलेल्या कुलूप पाहून दीपक ढोबळे यांच्यासह आलेल्या नागरिकांच्या वतीने दरवाजाला हार घालून गांधीगिरी करण्यात आली.
ढोबळे यांनी नगर भूमापन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून संपर्क साधून येथील कार्यालयाची कैफियत मांडली. कार्यालयाच्या कामकाजासंदर्भात सुधारणा न झाल्यास लोकहितासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दीपक ढोबळे यांनी दिला.