रावेत स्मशानभूमी : आयुक्तांच्या कारभाराने सर्वच आश्चर्यचकित
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथील सेक्टर क्रमांक 32 येथे स्मशानभूमी बांधण्यात येत आहे. त्याचे सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केल्याने आयुक्तांनी या कामाला स्थगिती दिली होती. मात्र आता काही नागरिकांनी पुन्हा याच ठिकाणी स्मशानभूमीची मागणी केल्याने आयुक्त पुन्हा याचा फेरविचार करणार आहेत.
महापालिकेने साधारण एक वर्षापूर्वी रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथील जागेत स्मशानभूमी बांधण्याचे ठरवले. त्यानुसार स्मशानभूमीच्या बांधकामास सुरूवात करण्यात आली. त्याचे 60 टक्के काम पूर्णही झाले. प्रभाक क्रमांक 16 मधील नागरिकांनी स्मशानभूमी बांधण्यासाठी तीव्र विरोध केला. त्यासाठी सातत्याने आंदोलने केली, वारंवार निवेदनेही दिली. ही स्मशानभूमी झाल्यास वाऱ्याच्या प्रवाहानुसार स्मशानभूमितून निघणारा धूर थेट नागरिकांच्या घराकडे येईल. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. असे सांगत स्थानिकांनी याला विरोध कोला. मात्र तरीही काम सुरूच होते.
30 डिसेंबर 2019 रोजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात प्रभाग क्रमांक 16 व 17 मधील सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक झाली. त्या बैठकीत आयुक्तांनी काम थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा काही नगरसेवकांसह नागरिकांनी आयुक्तांची भेट घेतली. स्मशानभूमी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. त्यावर आयुक्तांनी सर्वांना बोलावून याबाबत फेरविचार करणार असल्याचे आश्वासन दिले. स्थगिती देऊन पुन्हा फेरविचार हा आयुक्तांचा उलट कारभार पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकशाहीमुळे निर्णय बदलावे लागतात
स्मशान भूमी रद्द करण्यासाठी काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला होता. तेथील स्माशनभूमीचे काम रद्द करण्यासाठी नागरिकांनी नगरसेवकांसोबत भेट घेतली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून कामाला स्थगिती दिली होती. आज पुन्हा काही नागरिकांनी स्मशानभूमी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. 60 टक्के काम पूर्ण झाले असले तरी देशामध्ये लोकशाही आहे. त्यामुळे काही निर्णय बदलावे लागतात. याबाबत सविस्तर नगरसेवक व नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. स्मशानभूमीला पर्यायी जागा मिळाल्यास तेथे उद्यान करणे शक्य आहे.