कोरेगाव, दि. 11 (प्रतिनिधी) – कोरेगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या पिछाडीस असलेल्या जुन्या स्मशानभूमीच्या जागी आता आधुनिक आणि सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे तीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या सुशोभिकरणासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही कामांचे भूमिपूजन शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 10 वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
कोरेगाव शहर पश्चिम महाराष्ट्रातील आदर्श, स्वच्छ व सुंदर बनवण्याच्या प्रक्रियेत सुसज्ज स्मशानभूमीदेखील महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन केदारेश्वर मंदिराच्या पिछाडीस असलेल्या स्मशानभूमीचा पुर्नविकास करण्याचा निर्णय आमदार शिंदे यांनी घेतला होता. जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
सध्या अस्तित्वात असलेली स्मशानभूमी पाडून तेथे नवीन स्मशानभूमी बांधण्यात येणार आहे. पुणे, मुंबईसारख्या महानगरांमधील आधुनिक स्मशानभूमीच्या धर्तीवर नवीन स्मशानभूमीचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. पूर्वीची स्मशानभूमी दोन टप्प्यांमध्ये होती. नवीन स्मशानभूमी एकाच टप्प्यात बनवली जाणार आहे. प्रशस्त परिसर आणि अग्निकुंडे तयार केली जाणार आहेत. अंत्यविधीसाठी लागणारे जळण, शेण्या ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीची रचना करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना स्नान करण्यासाठी, कपडे आणि साहित्य ठेवण्यासाठी नव्या सुविधा देण्यात येणार आहेत.
पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. अंत्यविधीबरोबर सावडणे विधी, दहावा आणि तेराव्याच्या विधीसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्मशानभूमी परिसरात हायमास्ट दिवे, प्रशस्त पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. स्मशानभूमीपर्यंतचा रस्तादेखील तयार केला जात आहे. या स्मशानभूमीच्या परिसरात कडुनिंब, पिंपळ, वड, बांबू, अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच फुलझाडे दुतर्फा लावली जाणार आहेत. अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी अद्ययावत सुविधा, पोडियम बांधण्यात येणार आहे.
लिंगायत दफनभूमीसाठी 15 लाख
आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून तीन कोटींचा निधी, उद्या भूमिपूजनआमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून तीन कोटींचा निधी, उद्या भूमिपूजनकेदारेश्वर मंदिराच्या पिछाडीस वीरशैल लिंगायत समाजाची स्वतंत्र दफनभूमी असून, या परिसराच्या विकासासाठी आमदार महेश शिंदे यांनी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून स्मशानभूमी परिसरात रात्रीच्या वेळी उजेडासाठी हायमास्ट दिवे, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी अद्ययावत सुविधा, पोडियम बांधण्यात येणार आहे. आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.