कराड येथून सकाळी आठ वाजता शोकयात्रा निघणार; मुंढे गावासह जिल्ह्यावर शोककळा
कराड – संपूर्ण देश नववर्षाच्या स्वागतात गुंग झाला असताना 31 डिसेंबरच्या रात्री जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत मुंढे, ता. कराड येथील जवान संदीप रघुनाथ सावंत (आबा) यांना वीरमरण आले. हुतात्मा संदीप यांचे पार्थिव उद्या, दि. 3 रोजी सकाळी आठ वाजता कराड येथे आणण्यात येणार आहे. तेथून मुंढे गावापर्यंत शोकयात्रा काढण्यात येणार असून मुंढे येथे सावंत कुटुंबीयांच्या शेतात हुतात्मा संदीप सावंत यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतमातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा संदीप सावंत यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी आठ वाजता कराड येथील विजय दिवस चौकात आणण्यात येणार आहे. तेथून फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकयात्रा निघणार आहे. विजय दिवस चौक-छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (दत्त चौक)-शाहू चौक-कोल्हापूर नाका-गोटे नवीन बसस्टॉप-मुंढे मराठी शाळा-ग्रामपंचायत-चव्हाण मळा व हुतात्मा संदीप यांचे घर, असा शोकयात्रेचा मार्ग असेल. शोकयात्रा व अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासन व ग्रामस्थांनी तयारी केल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. शोकयात्रेच्या मार्गावर रांगोळी काढण्यात येणार असून पार्थिवावर पुष्पवृष्टीही करण्यात येणार आहे.
लहानपणापासूनच देशाची सेवा करायची खूणगाठ बांधलेले संदीप हे 2011 साली सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे मंगळवारी (दि. 31 डिसेंबर 2019) रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवान संदीप यांना गोळी लागून वीरमरण आले. ही बातमी मुंढे गावासह जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली.
जवान संदीप यांच्या हौतात्म्याने सावंत कुटुंबीय, नातेवाइक व अख्खा गाव शोकसागरात बुडाला आहे. देशरक्षणासाठी गावाने आपला सुपुत्र दिल्याने एका बाजूला अभिमान आणि त्याच वेळी जवान संदीप यांच्या हौतात्म्याचे दु:ख, अशी संमिश्र भावना ग्रामस्थ व युवकांमध्ये आहे. मात्र, हुतात्मा संदीप यांनी असा पराक्रम केला आहे की, ते युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.
जवान संदीप हे हुतात्मा झाल्याची माहिती बुधवारी दिवसभर त्यांची पत्नी, आई व कुटुंबातील इतर महिलांना देण्यात आली नव्हती. मात्र, घराजवळच त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आल्याने संदीप यांनी देशासाठी बलिदान दिल्याचे गुरुवारी सकाळी आई व पत्नीला समजले. त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हुतात्मा संदीप यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी मुंढे येथे उद्या (शुक्रवार) आणण्यात आल्यानंतर कराड-चिपळूण महामार्गाशेजारी असलेल्या कुुटुंबाच्या मालकीच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतात छोटेखानी मंडप उभारून अंत्यविधीसाठी चबुतरा तयार करण्यात आला आहे.