बारामती – बारामती नगर परिषदेने ओडीएफचा दर्जा घेतला आहे. पण, नगर परिषदेच्या स्वच्छतागृहात नळांना तोटी नाही, ही धक्कादायक बाब पक्षनेते सुनील सस्ते यांनी सर्वसाधारण सभेत नगर परिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने प्रशासकीय कामाचे वाभाडे निघाले. नगर परिषदेची सर्वसाधारण सभा लांबल्याने विरोधी पक्षनेते सुनील सस्ते स्वच्छतागृहात जाऊन आले.
मात्र, स्वच्छतागृहातील नळांची दुरवस्था झाली होती. ही बाब निदर्शनास येताच सस्ते यांनी आपण ओडीएफचा दर्जा घेतला आहे. पण, नगर परिषदेच्या स्वच्छतागृहात नळांना तोटी नाही, असे थेट आरोप सभागृहातच केला. यावर नळ खराब झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे सभागृहात काहीकाळ हशा पिकला; पण, सस्ते यांच्या आरोपांची दखल गटनेते सचिन सातव यांनी घेतली व ते तडक या बाबीची खातरजमा करण्यासाठी गेले.
दरम्यान, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनीही ही बाब मनावर घेत तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. या नंतर सभागृहातून जे जे सदस्य काही मिनिटांसाठी बाहेर पडले, ते त्या नळाच्या तोटीची पाहणी करण्यासाठी गेलेत, असा विनोद झाला. मात्र, काही काळातच प्रशासनाने याची दखल घेत नळांची दुरुस्ती बैठक संपण्याच्या आत केली. नगरसेवकांच्या सूचनांची दखल ज्या तत्परतेने घेतली त्याच तत्परतेने नागरिकांच्याही तक्रारींची दखल घ्या, असा सल्ला प्रशासनाला द्यायला नगरसेवक विसरले नाहीत.