शिक्रापूर – पेरणेफाटा (ता. हवेली) येथे भीमा नदीच्या तीरावर असलेल्या ऐतिहासिक विजय रणस्तंभास 202व्या शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी बुधवारी (दि. 1) विविध पक्ष, संघटना व मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या लाखो समाजबांधवांनी दिवसभर मोठी गर्दी केली होती.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथे मंगळवारी (दि. 31) मध्यरात्रीपासून भीमसैनिकांनी मानवंदनेसाठी गर्दी केली होती.
दिवसभर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने येथे रॅली, अभिवादन सभा घेऊन रणस्तंभास मानवंदना देण्यात आली. पेरणे फाटा येथे समता सैनिक दलाच्या वतीने विजय रणस्तंभास मानवंदना देण्यात आली. मानवंदनेसाठी आज आलेल्या प्रमुख मान्यवरांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आमदार ऍड. अशोक पवार यांच्यासह विविध संस्था व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी भीमसैनिकांचे स्वागत कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकाऱ्यांनी केले. पोलिसांचा चोख बंदोबस्त व योग्य नियोजनामुळे रणस्तंभ परिसरात गर्दी एकवटू दिली नाही.
लाखो भीमसैनिकांनी शांततेत मानवंदना दिली. अभिवादनावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी समन्वय साधत नागरिकांची गैरसोय होऊ दिली नाही. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन केले होते.