प्रदीप विधाते उपाध्यक्ष; दिग्गजांना डावलले, निवडी बिनविरोध
सातारा – सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद पाटील यांचे समर्थक शिरवळ गटातील सदस्य उदय सदाशिव कबुले तर उपाध्यक्षपदी माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे समर्थक खटाव गटातील सदस्य प्रदीप बापूसाहेब विधाते यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज इच्छुकांना डावलून पक्षाने समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत नाराजी असल्याने पक्षाकडून सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता. प्रत्यक्षात निवडी मात्र बिनविरोध झाल्या.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, दीपक पवार, उदय कबुले यांची नावे चर्चेत होती. उपाध्यक्षपदासाठी राजेश पवार, प्रदीप विधाते यांची नावे पुढे येत होती. अध्यक्षपदासाठी संजीवराजे व मानसिंगराव जगदाळे प्रबळ दावेदार मानले जात होते. राज्य मंत्रिंमंडळात आ. बाळासाहेब पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्याने राजकीय समीकरणे बदलली होती.
बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता होती. पदाधिकारी निवडीसाठी ना. रामराजे नाईक निंबाळकर, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, संजीवराजे नाईक निंबाळकर, सत्यजितसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर साडेअकराच्या सुमारास रामराजे यांनी अध्यक्षपदासाठी उदय कबुले आणि उपाध्यक्षपदासाठी प्रदीप विधाते यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर उदय कबुले यांच्या अर्जावर संजीवराजे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली तर प्रदीप विधाते यांच्या अर्जावर सूचक म्हणून धैर्यशील अनपट यांनी स्वाक्षरी केली. मुदतीपूर्वी दोन्ही अर्ज दाखल करण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 12 वाजेपर्यंतची वेळ होती. या वेळेत कबुले आणि विधाते यांचे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले होते. निवडीसाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता विशेष सभा झाली. यावेळी उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध असल्याचे सिंघल यांनी जाहीर केले. अध्यक्षपदासाठी उदय कबुले आणि उपाध्यक्षपदासाठी प्रदीप विधाते यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे सिंघल यांनी जाहीर केले.
निवडीनंतर उदय कबुले म्हणाले, “आ. मकरंद पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासकामे करणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन संजीवराजे व मानकुमरे यांच्याप्रमाणे काम करण्याची पध्दत पुढे सुरु ठेवणार आहे.’ संजीवराजे म्हणाले, “जिल्हा परिषदेला वेगळा इतिहास असून सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे.’ प्रदीप विधाते, भीमराव पाटील, धैर्यशील अनपट, शिवाजीराव चव्हाण, विजय पवार, अरुण गोरे, बापूसाहेब जाधव, अर्चना देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मनोज जाधव आदी उपस्थित होते.
नितीन भरगुडेंचा केला होता पराभव
उदय कबुले यांनी शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरंपच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. माजी खासदार कै. लक्ष्मणराव पाटील, आ. मकरंद पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून कबुले यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिरवळ गटातून कबुले यांनी अपक्ष लढत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे- पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे कबुले यांच्या कारकिर्दीला उभारी मिळाली होती. निकालानंतर कबुले यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता.
“तुम्ही एकटेच परत आलात’
सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडी मंगळवारी झाल्या. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेस सर्व नूतन सभापती उपस्थित होते. या सभापतींचा जिल्हा परिषदेने सत्कार करावा, अशी सूचना संजीवराजे यांनी केली. त्यानुसार नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला. कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांची फेरनिवड झाली. ते सत्कार स्वीकारण्यासाठी जात असताना “तुम्ही एकटेच परत आलात,’ असे संजीवराजे म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला.