सोलापुर : महाविकास आघाडी सरकारचा अखेर सोमवारी पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु, या विस्तारानंतर सरकारमध्ये नाराजीनाट्याला सुरूवात झाली असल्याचे दिसत आहे. बीडचे आमदार प्रकाश सोळंके हे आज आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर तिकडे प्रणिती शिंदे यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने कॉंग्रेसच्या नगरसेविकेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर मध्यच्या कॉंग्रेसच्या आमदार आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. प्रणिती शिंदे यांच्या नावाची पहिल्या दिवसापासून चर्चा सुरु होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या 36 जणांच्या अंतिम यादीत त्यांना स्थान मिळू शकले नाही. यावर प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. परंतु, त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी दिसून आली. सोलापूर महानगरपालिकेतील कॉंग्रेसच्या नगरसेविकेने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सोमवारी पक्षाच्या शहराध्यक्षांकडे महापालिका सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. प्रणिती शिंदे या सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. त्या उच्च शिक्षित आहेत. विधिमंडळात त्या अभ्यासपूर्ण चर्चा करतात, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देणे अपेक्षित होते. मात्र पक्षाने त्यांना संधी दिली नाही, त्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले. प्रणिती शिंदेंनी प्रतिकूल परिस्थितीत कॉंग्रेसची जागा राखली होती. तसेच त्यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा सुरु होती. पण अचानक मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना डावलण्यात आले.