मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे मुंडण केल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोमवारी बीडमध्ये एका व्यक्तीने सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने त्या व्यक्तीच्या अंगावर शाई फेकली.
#WATCH Maharashtra: Ink poured on a man reportedly by a woman Shiv Sena worker, in Beed allegedly over his social media post criticising Chief Minister Uddhav Thackeray. (30.12.19) pic.twitter.com/xH6QzTiDzx
— ANI (@ANI) December 30, 2019
बीडमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने उद्धव ठाकरेंविरोधात सोशल मीडियावर पोस्ट का टाकली असा जाब विचारत एका व्यक्तीच्या अंगावर बाटलीभरुन शाई ओतली. शाई फेकताना त्याचा व्हिडिओ काढण्यात आला. नंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. शिवसैनिकांच्या या कृतीचा भाजपकडून निषेध करण्यात येत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी तिवारी प्रकरणानंतर शिवसैनिकांना गुंड असे संबोधले होते. त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले होते.
मुंबईतील वडाळा येथेही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंविरोधात पोस्ट करणाऱ्या तिवारी नावाच्या व्यक्तीला मारहाण करत त्याचे मुंडण केले होते. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर काही शिवसैनिकांना अटकही करण्यात आली होती.