मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या चित्रपटाविषयी अनेक चर्चा जोर धरु लागल्या आहेत. या निमित्ताने दीपिकाने ऍसिड हल्ल्याबाबत केलेली जनजागृती किंवा चित्रपटाच्या कथेवरून निर्माण झालेला वाद असे अनेक विषय पुढे आले आहेत.
नुकतंच दीपिकाने ‘छपाक’ चित्रपटाला अनुसरून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला. या व्हिडिओमध्ये काही ऍसिड पीडित तरूणी आणि सामान्य माणसं आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
व्हिडिओची सुरूवात कशाप्रकारे ऍसिड हल्ला केला जातो यावर आहे. त्यानंतर या ऍसिड पीडित तरूणी कशाप्रकारे आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे जगत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय समाजात आणखी कोणते बदल होणं गरजेचं आहे, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
दीपिकाने खुद्द आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘बदलायचं आहे आणि आता लढायचं आहे’ असं लिहिलं आहे. त्याचप्रमाणे तिने हा संबंधीत व्यक्तींना देखील टॅग केले आहे.
दरम्यान, ‘छपाक’ चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. ऍसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या अव्हानात्मक प्रसंगांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे.