भीमराव आंबेडकर : पेरणे फाटा येथे परिसराची केली पाहणी
शिक्रापूर – महार समाजाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाचा इतिहास आज विखुरला असून, तो पराक्रम नागरिकांना माहिती होणे गरजेचे आहे. त्यासाठी एक संग्रहालय होणे महत्त्वाचे असून, ते संग्रहालय पेरणे येथील विजय रणस्तंभ परिसरात होऊन विजय रणस्तंभ हे पर्यटन स्थळ व्हावे, असे मत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
पेरणे फाटा (ता. हवेली) येथील विजय रणस्तंभ येथे 1 जानेवारी या शौर्य दिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी बुधवारी (दि. 25) भीमराव आंबेडकर यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बौद्ध महासभेचे केंद्रीय सचिव जगदीश गवई, जिल्हा प्रमुख रघुनाथ साळवे, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष
सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, सुनील अवचार, संजय माने, हरिश्चंद्र धावारे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
भीमराव आंबेडकर म्हणाले की, विजय रणस्तंभाचा इतिहास महाराष्ट्रातून बाहेर देशात पोहोचला आहे, तर येथील स्थानिक नागरिकांसह कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने येथील कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात येते. पोलीस प्रशासनावर या कार्यक्रमाचा मोठा ताण येत असून आम्ही पोलिसांना मदत करून पोलिसांवरील ताण कमी करीत आहे, तसेच येथील भागाचा विकास होऊन परिसर सुशोभित करण्यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत असून, भारत सरकारकडे देखील याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचेसुद्धा भीमराव आंबेडकर यांनी सांगितले.
विजय रणस्तंभ परिसरात होणार शौर्य पहाट
पेरणे फाटा येथील विजय रणस्तंभ परिसरात नागरिकांना पूर्वजांचा इतिहास माहिती व्हावा, त्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून विजय रणस्तंभ परिसरात शौर्य पहाट कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती देखील भीमराव आंबेडकर व सर्जेराव वाघमारे यांनी दिली.