मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला पालिका प्रशासनाकडून केराची टोपली
अद्याप एकाही अतिक्रमणावर कारवाई नाही : चौक्या, अनधिकृत पार्किंगसाठीही वापर
पुणे – शहरातील पुलांखालील अतिक्रमणे काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिका प्रशासनाने मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. अद्याप एकाही अतिक्रमणावर कारवाई झाली नसून, सर्व अतिक्रमणे जशीच्या तशी पुलाखाली आहेत.
शहरातील उड्डाणपुलाखालील जागा तत्काळ रिकाम्या कराव्यात, असे आदेश सर्व महापालिकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अशी नोटीस बजावली आहे. उड्डाणपुलांखाली चौक्या, अनधिकृत पार्किंग थाटण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा हा आदेश आहे.
“सजग नागरिक मंच’ या स्वयंसेवी संस्थेकडून महापालिका प्रशासनाला उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसंदर्भात पत्र पाठवले आहे. यामध्ये शहरातील अनेक पुलांखाली अतिक्रमण झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याविषयी एक जनहित अर्ज करण्यात आला होता. यावर निर्णय देत उच्च न्यायालयाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच महापालिकांना उड्डाणपुलाखालील जागा मोकळ्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2016 च्या आदेशानुसार ही अतिक्रमणे काढणे आवश्यक आहेत. उड्डाणपूल हे नागरिकांसाठी केले आहेत. पुलाखाली जर काही चुकीचे प्रकार होत असतील तर, हे त्वरित बंद झाले पाहिजेत. राज्य सरकारकडूनही तसे आदेश पारित झाले आहेत.
महापालिका अथवा अन्य संस्थांनी शहरात बांधलेल्या बहुतेक पुलाखाली अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याशिवाय काही पुलाखाली महापालिकेकडूनच सुशोभीकरण केले आहे. डेक्कन जिमखाना येथील पुलाखाली भंगार साहित्य ठेवले आहे. येथे बिनधास्तपणे खाऊगल्ली चालवली जाते. या खाऊगल्लीमध्ये सर्रास गॅस सिलिंडरचा वापरही केला जातो. हपडसर येथील उड्डाणपुलाखाली संपूर्ण भागात वाहनतळ उभारले आहे. धायरी, स्वारगेट या पुलांखालीदेखील पार्किंग केले जात आहे. हे अत्यंत धोकादायक असून, या जागा तत्काळ मोकळ्या करणे आवश्यक आहे.
उड्डाणपुलांच्या खालची जागा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरात याशिवाय शहरामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपुलांच्या खालची जागा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरण्यात येत आहेत. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून पुलाखाली चौक्या उभारण्यात आल्या आहेत. गाडगीळ पूल (झे ब्रीज) खाली तर, भंगारमाल ठेवण्यात आला आहे. हडपसर उड्डाणपुलाखाली पथारी व्यावसायिक व्यवसाय करत असून टेम्पो, रिक्षा यांचे वाहनतळ करण्यात आले आहे. मगरपट्टा येथील पुलाखाली दुचाकी आणि चारचाकीचे पार्किंग केले आहे.