जुमांजी च्या निमित्ताने एकत्र आलेल्या ड्वेन जॉन्सन आणि केविन हार्ट या दोघांनी ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. केविन हार्ट हा सांता क्लॉजच्या वेशभुषेमध्ये आहे, तर ड्वेन जॉन्सन हा एल्फ कॉस्च्युममध्ये आहे. अर्थात त्यांचा हा उद्योग “जुमांजी’च्या प्रमोशनसाठीच होता. केविन हार्ट आणि ड्वेन जॉन्सनचा “जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल’ गेल्या आठवड्यातच रिलीज झाला.
भारतात त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या आठवड्यातच आतापर्यंत 24 कोटींची कमाई या हॉलिवूडपटाने केली आहे. या आनंदाचे सेलिब्रेशन म्हणूनच केविन हार्टने इन्स्टाग्रामवर सांता क्लॉजच्या वेशभुषेतला हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्या प्रेक्षकांनी अद्याप “जुमांजी’बघितलेला नाही, त्यांच्यासाठी थिएटरमध्ये एक खास सरप्राईज आहे, असे या दोघांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
थिएटरमध्ये स्नॅक्स, सोडा, स्वॅग आणि इतरही काही नेता येऊ शकणार आहे. त्याबरोबर आणखी एक सरप्राईज असेल. ते काय ते “जुमांजी’ बघितल्यावरच समजेल, असे ड्वेन जॉन्सनने म्हटले आहे. स्टंट आणि फाईटचा तडका असलेल्या “जुमांजी’मधून बाळगोपाळांना नाताळची खास भेट म्हणून सादर करण्याचा हा फंडा मस्त आहे.