अनेक देशात हिवाळ्यात धरणी बर्फाचे पांघरुण घेते तेव्हा जगात उत्साहात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नाताळ. प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिन यावेळी साजरा केला जातो त्यानिमित्ताने…
येशूचा जन्म होण्यापूर्वी शेकडो वर्षांपूर्वी यशया व मीखा या दोन यहुदी भविष्यवाद्यांनी दैवी प्रेरणेने भविष्य केले होते. त्यापैकी यशयाने लिहिले होते की, पाहा कुमारी पुत्र प्रसवेल त्याला “इम्यानुएल’ म्हणजे “आम्हाबरोबर देव’ असे म्हणतील. तर मीखाने लिहिले होते. “त्याचा जन्म इस्राएलमधील बेथेलहेम’ या गावात होईल. हे दोन्ही भविष्य खरे ठरले. तेव्हा यहुद्यांना “आम्हाबरोबर देव’ या भविष्यवाणीप्रमाणे खरोखर अनुभव आला. जे चमत्कार केवळ देवच करू शकतो असे अद्भुत चमत्कार येशूने केले.
त्याने आंधळ्यांना डोळे दिले. लंगड्यांना पाय दिले. कुष्ठरोग्यांना शुद्ध केले. मेलेल्यांना पुन्हा जिवंत केले. भूतग्रस्तांना मुक्त केले. एवढेच नव्हे तर तो समुद्रावरून चालला. खवळलेला समुद्र त्याने केवळ शब्दाने शांत केला. पाच भाकरी व दोन मासे यावर आशीर्वाद देऊन त्याने पाच हजार लोकांना तृप्त केले.
जेव्हा येशूचा जन्म झाला. तेव्हा निसर्गामध्येही चमत्कार झाला. एक तारा इस्राएलच्या पूर्व दिशेला दिसला. त्या काळच्या तीन खगोल शास्त्रज्ञांनी हा तारा पाहून असे अनुमान काढले की एखादा राजा जन्मला असावा. त्या ताऱ्याचा मागोवा घेत ते तीन खगोल शास्त्रज्ञ त्या काळी इस्राएलमध्ये आले होते. त्या अद्भुत दैवी येशूबाळाचे दर्शन घेऊन त्याला, सोने, गंधरस व सुगंधी द्रव्य त्यांनी अर्पण केले.
यहुदी लोक हे व्यवसायाने मेंढपाळ होते. त्या सामान्य मेंढपाळांना त्या रात्री देवदूतांनी ख्रिस्त जन्माची सुवार्ता सांगितली. ते म्हणाले “भिऊ नका कारण जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे. त्याची सुवार्ता तुम्हास सांगतो ती ही की, आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त (मसीहा) आहे.’ येशूचे जीवन हे रंजले गांजलेले, समाजामधून वाळीत टाकलेले गरीब लोकांना समर्पित होते. तो तीस वर्षांचा झाल्यावर त्याने त्याच्या अलौकिक समाज सेवेला सुरुवात केली. जगाचा अखेरचा निरोप घेण्यापर्यंत त्याने ही सेवा केली.
त्याने अनेक प्रवचने दिली. त्याचा स्वर्गातून पृथ्वीवर येण्याचा मुख्य उद्देश त्याने अनेकदा कथन केला. तो पुढीलप्रमाणे-
मी नीतिमान लोकांसाठी नाही तर पापी व बहकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आलो आहे. मी हरवलेले शोधण्यास व त्यांचे तारण करण्यासाठी आलो आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जनहो तुम्ही सर्वजण माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. मी जगाचा प्रकाश आहे. मी जीवनाची भाकर व पाणी आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालीक जीवन (स्वर्ग) प्राप्त होईल इत्यादी.
त्याकाळी येशूने ज्यांची खरोखर भेट घेतली त्या अनेक लोकांचे जीवन बदलले. त्यांना स्वर्गीय आनंद व शांती प्राप्त झाली. त्यांच्या अंधःकाराचे प्रकाशात रूपांतर झाले. त्यांचे दुःख आनंदात बदलले. त्यांचे रोग, आजार पळून गेले. सर्व जगाला आपल्या अलौकिक जीवनाद्वारे “बायबलची सुवार्ता’ गाजविणाऱ्या आणि देवाचे प्रबळ अस्तित्व इस्राएलमध्ये खरोखर आहे हे “इम्यानुएल’ या भविष्यसूचक नावाप्रमाणे सिद्ध करून दाखविणाऱ्या येशूचा जन्मदिन 25 डिसेंबर या तारखेला जगभर आनंदाने व उत्साहाने आणि गरिबांना व दुर्लक्षितांना मदत करून साजरा केला जातो. येशूच्या जन्माचे वर्णन बायबलमध्ये पुढील वचनात केले आहे.
“देवाने जगावर एवढी प्रीतह केली की ज्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त व्हावे.’ आमेन.