वाघळवाडी – यंदाच्या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण महिना अखेरीस म्हणजेच येत्या गुरुवारी (दि. 26) सकाळी आठ ते अकरा या वेळेत “कंकणाकृती सूर्यग्रहण’ अर्थात “रिंग ऑफ फायर’ दिसणार आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यात हे ग्रहण “कंकणाकृती सूर्यग्रहण’ असणार आहे, तसेच ही एक निसर्ग व अंतराळाशी नाते जोडणारी ही दुर्मिळ संधी असणार आहे, मात्र देशवासियांसह पुणे जिल्ह्यातील नागरिकांना हे सूर्यग्रहण खंडग्रास अवस्थेत अनुभवायला मिळणार आहे. यापूर्वी याचवर्षी 6 जानेवारी आणि 2 जुलै 2019 रोजी खंडग्रास सूर्यग्रहण लागले होते.
भारतात सूर्योदयानंतर कंकणाकृती सूर्यग्रहण देशातील दक्षिण भाग कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये दिसेल. तर देशातील इतर भागात हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहणच्या रुपात दिसेल, असे खगोल शास्त्रज्ञांनी सांगितले. भारतीय वेळेनुसार खंडग्रास सूर्यग्रहण सकाळी 8 वाजता दिसेल. तर कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी 9.06 वाजता दिसेल. सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. तर ग्रहणाची खंडग्रास अवस्था दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी संपेल.
या सूर्यग्रहणामध्ये सुर्याचा 93 टक्के भाग हा चंद्राने झाकला जाईल. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आल्यामुळे सुर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही याला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य ग्रहण बघत असताना योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. म्हणजे सूर्यग्रहण बघत असताना ते उघड्या डोळ्यांनी बघु नये योग्य साधनांचा वापर करुन ग्रहण बघणे उचीत ठरते, असे खगोल प्रमींनी सांगितले.
कंकणासारखी प्रकाशाची कडा
कंकणाकृती सूर्यग्रहण हे दरवर्षी दिसत नाही. नियमित दिसणाऱ्या खग्रास ग्रहणावेळी पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सरासरी पेक्षा कमी असते. त्यामुळे चंद्र, सूर्याचे बिंब हे सारखेच दिसते. म्हणून सूर्यबिंब हे चंद्रबिंबाने झाकले जाते. परंतू कंकणाकृती ग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर जास्त असते. तेव्हा सूर्यबिंबापेक्षा चंद्रबिंब लहान दिसते यामुळे सूर्यबिंब पूर्ण झाकले जात नाही आणि कंकणासारखी प्रकाशाची कडा दिसते, त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतो.
पश्चिम महाराष्ट्रात यावेळी दिसेल ग्रहण
पश्चिम महाराष्ट्रा काही भागा विचार करायचा झाल्यास आपणाला हे ग्रहण खंडग्रास पद्धतीचे अनुभवता येता येणार आहे. ग्रहणाची सुरुवात सकाळी 8 वाजुन 4 मिनिटांनी होणार आहे. हे ग्रहण 10 वाजुन 53 मिनिटांनी संपणार आहे. म्हणजे या ग्रहणाचा कालावधी 2 तास 56 मिनिटे एवढा आहे. याकालावधीमध्ये 9 वाजुन 23 मिनिटांनी चंद्र हा सुर्याच्या जास्तीत जास्त भाग व्यापल्या सारखा दिसणार आहे. नंतर ही व्याप्ती हळहळू कामी होऊन 10 वाजुन 59 मिनिटांनी हे ग्रहण संपेल.
ग्रहणाबाबत अंधश्रद्धा?
सूर्यग्रहण, चंद्रग्रहण आले की काळजाचा ठोका चुकतो, तो गरोदर मातांचा. भाजी चिरली की गर्भाचे ओठ फाटणार, बोटे जुळविली तर गर्भाची बोटे जुळणार, पापण्या मिटविल्या तर डोळ्यात व्यंग येणार अशा अनेक अंधश्रद्धांचे काहूर माजते. त्याचबरोबर ग्रहणात मंदिरांचे दरवाजेही बंद ठेवण्यात येतात. एवढेच ग्रहण पाहायचे नाही, जेवायचे नाही अशाही काही अंधश्रद्धा आहेत. मात्र हा नैसर्गिक आविष्कार असल्यामुळे या अंधश्रद्धांवर विश्वास न ठेवता, या विलोभनीय खेळाचा आनंद घेण्याचे आवाहन खगोलप्रेमींनी केले आहे.