गुलाबी थंडीचे बोचऱ्या थंडीत रूपांतर
नगर – गेल्या दोन तीन दिवसा पासूनच्या गुलाबी थंडीचे आज पासून बोचऱ्या थंडीत रुपांतर झाल्याचं अनुभवायला मिळालं.हवेत गारठा वाढला असताना थंडीची चाहूल लागली होती मात्र आज अचानक नगरचा पारा प्रथमच 15.4 सेल्सियस अंशावर आल्याने थडी सुरु झाल्याची पक्की खात्रीच पटू लागली आहे.
नगर शहराची सकाळ धुक्याची दुलई लपेटूनच झाली ही धुक्याची दुलई इतकी दाट होती कि काही फुटांवरच्या अंतरावरचेही दृश्य दिसत नव्हते त्यामुळे वाहनांची वाहतूकही धिम्या गतीने सुरु होती. अवजड वाहने आणि इतर वाहनांचीही वाहतूक दिवे लावूनच सुरू होती. थंडीमुळे प्रवाशांची संख्याही रोडावल्याचे दिसत होते. एरवी गजबजलेल्या एस. टी. स्टॅंडवर तुरळक गर्दी दिसत होती. ज्यांना प्रवास करणे अगदीच गरजेचे आहे तेवढेच प्रवासी उबदार कपड्यानिशी प्रवासासाठी बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले.
शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी नगरला येतात आज ते ही उबदार कपड्यांसह कानटोप्या आणि मुलींनी स्कार्फ बांधूनच स्वतःचे थंडीपासून संरक्षण केले शाळेत जाणारी मुलं, सकाळी फिरायला जाणाऱ्याणांही उबदार कपड्यांचा आधार घेतला. सकाळी आठच्या नंतर धुक्याची दुलई काहीशी विरळ झाली. त्यानंतरही गारवा कायम राहिल्याने थंडी वाजत होती. सकाळी नऊच्या सुमारास या धुक्याच्या दाटीतून अंधुकसे सूर्यदर्शन झाले.