पुणे – शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस थंडीचा मुक्काम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यातच तापमानाचा पारा 8 अंशांखाली येऊन हुडहुडी भरणारी थंडी पडेल. तर दुपारीही थंडी जाणवेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
शुक्रवारी (दि. 2) शहराच्या मध्यवर्ती भागात 12 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर गेल्या 24 तासांत हवेली तालुक्यात सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. एनडीए आणि शिरूर परिसरात 11.4 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दरम्यान, काही भागांमध्ये थंडी आणि दाट धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. दि. 6 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. म्हणजे 12 अंशावर असलेले किमान तापमान 8 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे.
पुढील आठवड्यात वातावरण बदल
बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे आर्द्रता घेऊन येत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे संपूर्ण राज्यात पुढील आठ दिवस आकाश निरभ्र तर अधून मधून आकाश ढगाळ राहील. पुढील दोन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. त्यामुळे राज्यातील काही भागांत पुढील 24 तासांत किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट होईल.
पुणे परिसरातील किमान तापमान
हवेली 11.1, शिरूर आणि एनडीए 11.4, बारामती 12.2, शिवाजीनगर 12.6, लोणावळा 12.8, पाषाण 13.5, दौंड 13.9, भोर 14.3, आंबेगाव 16.1, कोरेगाव पार्क आणि चिंचवड 17, मगरपट्टा 17.7, वडगावशेरी 18.9