ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदनेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
11 ठिकाणी पार्किंग, मोठा पोलीस बंदोबस्त
कोरेगाव भीमा / शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील परिसरातील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी अकरा ठिकाणी पार्किंग व इतर मुलभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येथील नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर असतानाच परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी प्रशासनाने बैठकांचे आयोजन करण्यास सुरूवात केली आहे. यावर्षीही मोठा पोलीस बंदोबस्त व 10 किलोमीटर क्षेत्रावर ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधांची पाहणी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक व पेरणे विजयस्तंभ या ठिकाणी हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे, तहसीलदार लैला शेख, सुनील कोळी, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सदाशिव शेलार, शिरुर गटविकास अधिकारी विजय नलावडे, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, नायब तहसीलदार सुनील शेळके, सहायक पोलीस निरिक्षक मयुर वैरागकर, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे, उपसरपंच रवींद्र वाळकेव ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवासांठी 11 ठिकाणी पार्किंग करण्यात येणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी लाकडी बॅरिकेट्ससह खाद्य पदार्थांचे स्टॉल, लाऊड स्पिकर्स, विद्युत दिवे बसविण्यात येणार आहे.
वाहनतळापासून स्तंभापर्यंत येण्यासाठी 200 बसने अंतर्गत वाहतूक करण्यात येताना 20 टक्के जादा वाहकांचीही मागणी करण्यात आली आहे. 150 पाण्याचे टॅंकर, 10 किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांसह ड्रोन कॅमेऱ्याने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खाद्य पदार्थांची तपासणी दोन दिवस करण्यात येणार आहे. विजयस्तंभ ते टोलनाका परिसर विद्युत दिव्यांनी प्रकाशमान होणार आहे. 600 मोबाइल शौचालय उभारण्यात येणार आहेत. फायर बलुन्स व फायर फायटरचीही व्यवस्था यावर्षी केली आहे. मानवंदनेसाठी येणाऱ्या समाज बांधवांना पिण्याचे पाणी, नाष्टा, जेवणाची व्यवस्था सामाजिक संस्था, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. येथील प्रत्येक गल्लीला बॅरिकेट्सने बंद करण्यात येणार आहे.
एक जानेवारीला तगडा पोलीस बंदोबस्त
अप्पर पोलीस अक्षीक्षक 9, उपविभागीय पोलीस अधिकारी 41, पोलीस निरीक्षक 133, दुय्यम अधिकारी 363, पोलीस कर्मचारी 3850, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी 347, वाहतूक पोलीस कर्मचारी 496, होमगार्ड 700, 14 एसआरपी कंपनी, 13 आरसीपी कंपनी असा तगडा पोलीस बंदोबस्त राहणार आहे. समता सैनिक दलाचे जवान, 700 शांतीदूत, 5 टन सरकारी 30 वाहने, लाईट व्हॅन 20 वाहने, इतर वाहने 174, वॉकीटॉकी 580, बॅरिकेट्स 480, ड्रोन कॅमरे 12, पीए सिस्टीम 35, अग्निशमन वाहन 33, खासगी वाहने 200, पाण्याचे टॅंकर 133, क्रेन 16, ऍम्ब्युलन्स 200, फायर बलुन्स 200, कॅमरे 25, सीसीटिव्ही 300, दुर्बीण 20, व्हीडीओग्रॉफर 20 असा बंदोबस्त आहे.