जि. प. पदाधिकाऱ्यांच्या निवडी अनिश्चित
ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची मुदत 20 डिसेंबरला संपत असल्याने त्यापूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र,काल परत सुधारित आदेश काढून 20 डिसेंबर नंतर योग्य कार्यवाही करून निर्णय घेण्याचे आदेश पारित केल्यामुळे आता नेमका हा निवडणूक कार्यक्रम कधी घ्यायचा याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नवा कार्यक्रम अद्याप तयार नाही.
नगर – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी दि.12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे.
पंचायत समित्यांमध्ये सभापतिपदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांकरता आरक्षण निश्चित करावयाचे आहे.
त्यासाठी एकूण 14 सभापती पदांपैकी अनुसूचित जाती – एक, अनुसूचित जाती महिला – एक, अनुसूचित जमाती – एक, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – दोन, सर्वसाधारण – तीन आणि सर्वसाधारण महिला -चार अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितले. या सोडतीसाठी नागरिकांनी उपरोक्त ठिकाणी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांना उद्या कोणते आरक्षण निघणार याची धाकधुक लागून आहे.